सकारात्मक बातमी! शिनगारे कुटूंबाकडून विधवा प्रथेचा त्याग, शासनाच्या निर्णयाची सांगोलामध्ये अंमलबजावणी.

सांगोला ( बातमी. in टीम ) : परंपरेने चालत आलेल्या अन्यायकारी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी शासनाने नुकताच एक निर्णय जाहिर केला होता. यानुसार राज्यातील ग्रामपंचायतमध्ये अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी ठराव करण्यात आले होते. त्यानुसार मात्र अंमलबजावणी होताना कुठे दिसत नव्हती. मात्र सांगोला तालुक्यातील सदर प्रथेला मूठ माती देणारी सकारात्मक घटना सांगोला तालुक्यातील चिंचोली मांजरी गावात घडली आहे. शिनगारे परिवार यांनी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी पहिले पाऊल उचलले.

सांगोला तालुका गटविकास अधिकारी आनंद लोकरे व बालविकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार- मणेरी व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सांगोला व कोळा पर्यवेक्षिका तसेच डॉक्टर आंबेडकर, शेती विकास संस्था यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये परंपरेने चालत आलेल्या अन्यायकारी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी ठराव करण्यात आले होते.

गावातील रहिवासी रमेश केराप्पा शिनगारे सर यांचे निधन होऊन तीन दिवस उलटले होते. अंगणवाडी सेविका वंदना हजारे, नागर होवाळ यांनी शिनगारे परिवाराशी या प्रथा निर्मुलनासाठी चर्चा केली.त्सदर कुटूंबातील सदस्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रसंगी रविवारी सकाळी गावातील सर्व लोकांना आवाहन करत बालविकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार- मणेरी, कल्पना मोहिते व चिंचोली वासियांकडून शिनगारे सरांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर घटनास्थळी आसमा आतार-मणेरी यांनी शिनगारे सरांच्या पत्नी वैजंता शिनगारे यांचे कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नये व मंगळसूत्र व जोडवी काढू नये, कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रतिबंध करू नये, हळदी-कुंकू कार्यक्रमास बोलावण्यात येत नाही त्याचा विरोध करावा, हिरवा रंग,अलंकार परिधान करण्यापासून प्रतिबंध करू नये, यासाठी शिनगारे परिवाराला विनंती केल्यानंतर रमेश शिनगारे सरांचे भाऊ जालिंदर शिनगारे यांनी पुढाकाराने या प्रथेच्या निर्मूलनासाठी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व आम्ही या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी तयार असल्याचे कबूल केले.तसेच उपस्थित सर्व महिला भगिनी व पुरुषांना देखील शासनाच्या शासन निर्णय व परिपत्रकाची कागदावर अंमलबजावणी न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी सकारात्मक व मोठ्या दिल्याने साथ देण्याची हाक दिली.

यानंतर देविदास वसंत नांगरे माजी प्राचार्य घानंद ता. आटपाडी यांनी देखील पुढे येत या अनिष्ट विधवा प्रथेविरुद्ध एकत्रित येण्याचे आवाहन केले. यानंतर तात्काळ सुशिला पाटील मुख्याध्यापिका यांनी रमेश शिनगारे सरांच्या पत्नी गौरी गणपती मध्ये सुहासिनी म्हणून बोलवण्याची ग्वाही दिली. शेवटी आसमा आतार- मणेरी यांनी घटनास्थळी अनिष्ट विधवा प्रथेविरुद्धची शपथ घेतली. याप्रसंगी चिंचोली गावचे सरपंच वंदना बेहेरे, डॉ. राजेश शिनगारे,सौ. सुरेखा शिनगारे, सौ. कल्पना शिनगारे व सौ यशोदा पाटील तसेच शिनगारे परिवार चे आप्तेष्ट, चिंचोली,मांजरी ग्रामवासी व सांगोला तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Comment