केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आता स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेताना, नागरिकांना रेशनकार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही. विना रेशनकार्डचे आता नागरिकांना धान्य दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
रेशनकार्ड प्रक्रिया अधिक सोपी होत असून, “आतापर्यंत धान्य घेताना नागरिकांना दुकानदाराला रेशनकार्ड दाखवावं लागत होतं. परंतु, आता त्याची गरज नाही. रेशन कार्डधारकांनी आता दुकानदारांना फक्त रेशन कार्ड नंबर व आधार नंबर सांगितला, तरी लाभार्थी कुटुंबांना रेशन मिळणार आहे. यामुळे कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त अनेकांना दुसऱ्या शहरात किंवा परराज्यात असणाऱ्या नागरिकांना सुद्धा रेशनकार्ड मूळ गावी असले, तरी रेशनकार्ड नंबर व आधार नंबर सांगून देशातील कोणत्याही दुकानातून सहज रेशन मिळणार आहे. त्यासाठी मूळ रेशनकार्ड दाखवण्याची गरज नाही, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितलं.